चिमुकल्याच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी लावलं ‘फेविक्विक’; नर्सच्या कृत्याने खळबळ

Nurse Uses Fevikwik On Wound : कर्नाटकमधील सरकारी रुग्णालयात एका नर्सने जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विकचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना १४ जानेवारी रोजी हवेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडली आहे. गुरुकिशन अन्नप्पा होसमणी (वय-०७) असं या चिमुकल्याचा नाव आहे.
नेमकं काय झालं?
गुरुकिशन होसमणी याच्या गालावर खोल जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्याचे पालक त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. या पालकांनी नर्सचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ती त्यांना सांगत होती की ती हे अनेक वर्षांपासून करत आली आहे. इतकेच नाही तर टाके घातल्यास त्याचे व्रण अनेक वर्ष राहातात त्यापेक्षा फेविक्विक वापरणे चांगले असल्याचे नर्सने त्यांना सांगितलं. मात्र मुलाच्या पालकांनी तिच्याविरोधात तक्रार दिली आणि घटनेचा व्हिडीओ देखील सादर केला.
या नर्स जखमेवर फेविक्विक लावतानाचा व्हिडिओ असताना देखील तिला निलंबित करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तिची ३ फेब्रुवारी रोजी हावेरी तालुक्यातील गुथ्थल येथील दुसर्या आरोग्य संस्थेत बदली केली. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. ज्या मुलावर हे अघोरी उपचार करण्यात आले त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी नर्सविरुद्ध तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना व्हिडिओही दाखवला. परिचारिकेवर कारवाई करण्यात आली आणि बुधवारी तिला निलंबित करण्यात आले. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत परिचारिकेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फेविक्विक हा एक चिकटवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ आहे, ज्याची वैद्यकीय वापरासाठी नियमांनुसार परवानगी नाही. या प्रकरणात मुलावर उपचार करण्यासाठी फेविक्विक वापरणाऱ्या स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आले आहे. तसेच नर्सची अधिक चौकशी सुरू आहे. यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती. ज्यामुळे पीडित मुलाच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र, आता नर्सला निलंबित करण्यात आले आहे आणि सात वर्षाच्या मुलाची प्रकृती देखील ठीक आहे.


