फेस्टिव सीझन! जीएसटी कपातीनंतर तब्बल 2 लाख रोजगार निर्माण होणार

मुंबई – अर्थसंकल्पात केंद्र सरकारने प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा वाढवून 12 लाख इतकी केली असतानाच उत्सवाच्या काळात जीएसटी परिषदेने 350 वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे. अशा परिस्थितीत रिटेल स्टोअरवरून आणि ई-कॉमर्सवरून विक्री वाढणार आहे. यामुळे विविध क्षेत्रात उत्सवाच्या काळात दोन लाख अधिक रोजगार निर्माण होतील, असे एका पाहणीत आढळून आले आहे.
एनएलबी सर्व्हिसेस या कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. विशेष म्हणजे ही रोजगार निर्मिती मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरातही होत असल्याचे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अलग यांनी सांगितले. विविध क्षेत्रातील कर्मचारी भरती गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी वाढून दोन लाख इतकी वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
ई-कॉमर्स कंपन्याबरोबरच आता रिटेल स्टोअरही ग्राहकांना त्यांच्या वस्तू घरपोच पाठविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. परंपरागतिक ई-कॉमर्सबरोबरच आता क्विक कॉमर्स कंपन्या वेगाने विस्तार करीत आहेत. या क्षेत्रात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.
एकूण रोजगार निर्मितीपैकी 70 टक्के रोजगार गिग रोजगार म्हणजे अस्थाई असणार आहेत. तर 30 टक्के रोजगार हे स्थायी स्वरूपातील असणार आहेत. याचा अर्थ कंपन्या अस्थाई कर्मचार्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. उत्सवाच्या काळात जी कर्मचारी भरती केली जाणार आहे, त्यातील 26 टक्के कर्मचारी नंतर कामावर ठेवण्याची तयारी क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांनी केली असल्याचेही सांगण्यात आले.
मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये कर्मचारी भरती जास्त होणार आहे असे सांगून अलग म्हणाले की, भुवनेश्वर,कोची, इंदोर, सुरत, नागपूर या ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 30 ते 40 टक्के जास्त कर्मचारी भरती होणार आहे. विशेष म्हणजे या कर्मचारी भरतीत महिला कर्मचार्यांचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढत आहे.





