Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; दोघांना अटक, पोलिसांकडून मोठी कारवाई

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराला धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अनोज बबन नवगिरे (वय ३४, रा. मंगळवार पेठ) आणि चिराग नरेश किराड (२४, रा. लाल देऊळ सोसायटी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे दोघेही त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्य आहेत. याबाबत २० वर्षीय महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून दोन आरोपींना अटक केली होती.
आरोपींना अटक करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी करत सरकारी वकील अमर ननावरे यांनी युक्तिवाद केला की, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्यातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पंचनामा करून जप्त करण्यात आलेले आहे. आरोपींनी जाणीवपूर्वक हा गुन्हा केला आहे. याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. महिला पत्रकार ही घटनेवेळी मिरवणुक पाहण्यासाठी नाही तर त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेली होती.
आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत
आरोपींच्यावतीने ॲड प्रताप परदेशी यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांच्या न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील करत आहेत.





