SSC Result 2020 : नापास झालाय? त्यात काय? अक्षय कुमारही झाला होता!

प्रशांत शिंदे
यंदा जगभरासह भारत देखील कोरोना विषाणू संकटाशी दोन हात करत असल्याने दहावीच्या निकालास ( SSC Result 2020 ) बराच उशीर झाला. अखेर आज निकाल ( SSC Result 2020 ) जाहीर करण्यात आल्याने ही प्रतीक्षा संपली. यंदा कोरोना संकटामुळे पेढ्यांचा बॉक्स घेऊन कुणीच आलं नसलं तरी यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणांचे आकडे पालक व नातेवाईकांच्या सोशल मीडियावर झळकल्याने निकाल लागलाय याची खात्री पटली.
असं असलं तरी सर्वांनाच दहावीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळालंय असं नव्हे. अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेत तर काही जण अनुत्तीर्ण देखील झालेत. अशा अपेक्षित यश न मिळालेल्या अथवा अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं काही एक कारण नाही. जीवनामध्ये अनेकदा यशाची सुरुवात अपयशातूनच होत असते आपण केवळ न खचता प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. जर तुम्ही आजच्या निकालाने उदास झाला असाल किंवा तुम्हाला हरल्यासारखं वाटत असेल तर या कहाण्या तुम्हाला नक्की प्रेरणा देतील…
अक्षय कुमार – अक्षय कुमार हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता. अक्षयने आपल्या दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. अनेकांना यावर विश्वासही बसणार नाही मात्र हाच अक्षय शाळेमध्ये असताना एकदा अनुत्तीर्ण झाला होता. आपण अनुत्तीर्ण झाल्याचं पालकांना कसं सांगायचं असा प्रश्न त्याला सतावत होता, परंतु धाडस करत त्याने आपल्या पालकांना याबाबत सांगितलं. त्याच्या पालकांनीही समजून घेत त्याला प्रेरणा दिली. याच अपयशातून धडा घेत अक्षयने गगनभरारी घेतली.
संदीप माहेश्वरी – सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेकांना हे नाव परिचित असेल. माहेश्वरी यांचे असंख्य प्रेरणादायी व्हिडीओ तरुणांच्या स्टेटसला झळकत असतात. लाखोंसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ असलेले संदीप माहेश्वरी यांनी देखील आपल्या महाविद्यालयीन शिक्षणात अपयशाचा सामना केलाय! काही वैयक्तिक कारणांमुळे किरोरी मल कॉलेज सोडावं लागलेल्या माहेश्वरी यांनी पुढं जाऊन स्टॉक फोटोंचे भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन दालन उघडलंय.
कल्पना सरोज – वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी लग्न! लग्नानंतर पती व त्याच्या कुटुंबियांकडून छळ, आत्महत्येचा प्रयत्न अशा टोकाच्या अडचणींचा सामना केल्यानंतर सरोज यांनी प्राप्त केलेलं यश दैदिप्यमान आहे. शिलाई कामापासून व्यवसायास सुरुवात केलेल्या सरोज आज अनेक कंपन्यांच्या मालक असून त्यांच्या नावे कोट्यवधींची संपत्ती आहे.
पी सी मुस्तफा – एका अशिक्षित कुटुंबात जन्मलेले मुस्तफा इयत्ता सहावीमध्येच नापास झाले होते. यानंतर त्यांनी अनेक दिवस शेतामध्ये मजुरी केली. मात्र हे काम करत असताना शिक्षणानेच आपला उद्धार होऊ शकतो ही गोष्ट मुस्तफा यांनी उमगली. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून एमबीए केलं. आज त्यांचा स्वतःचा व्यवसाय असून ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.
वीर दास – नेटफ्लिक्स स्टार व प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास याला देखील बोर्डाच्या परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळाले होते. मात्र त्याने खचून न जाता आपली आवड जोपासली. आज तो एक प्रसिद्ध कॉमेडियन असला तरी तो शाळेमध्ये असताना तो ‘ढ’ विद्यार्थी म्हणून ओळखला जाई.
या सर्व कहाण्या वेगवेगळ्या लोकांच्या असल्या तरी या सर्वांनीच यश प्राप्तीसाठी जिद्द, कष्ट, चिकाटी आणि अपयशातून मार्ग काढण्याची कला हे गुण जोपासल्याचं दिसतं. जर तुम्हालाही आजच्या निकालामध्ये अपेक्षित यश मिळालं नसेल किंवा तुम्ही अनुत्तीर्ण झाला असाल तर तुम्हीही यातून प्रेरणा घेऊन अपयशाच्या या पहिल्या पायरीचा उपयोग यशाचं शिखर सर करण्यासाठी नक्कीच करू शकाल.






