फेडरल रिझर्वची 0.25% व्याजदर कपात: शेअर बाजारात तेजी, महागाई-बेकारीच्या कात्रीत धाडसी निर्णय

न्यूयॉर्क – अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने व्याजदरात 0.25 टक्क्याची कपात केली आहे. त्याचबरोबर डिसेंबरपूर्वी आणखी दोन वेळा व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. या घटनाक्रमानंतर अमेरिका, युरोप आणि भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यात मदत झाली.
गेल्या सहा महिन्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेडरल रिझर्ववर व्याजदर कपातीसाठी दबाव टकत होते. आता झालेल्या 0.25% च्या कपातीमुळे अमेरिकेतील मुख्य व्याजदर आता 4 ते 4.5% दरम्यान झाले आहेत. दरम्यान अमेरिकेची अर्थव्यवस्था हळूहळू वाढत आहे. त्यामुळे फेडरल रिझर्वने 2025 चा विकासदर अंदाज वाढवून 1.6% इतका केला आहे. जून महिन्यामध्ये हा अंदाज 1.4% इतका वर्तविण्यात आला होता.
महागाई जास्त पातळीवर आहे. मात्र बेकारीचा दर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कपात करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. पतधोरण समितीच्या 12 पैकी 11 सदस्यांनी पाव टक्के व्याजदर कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. मात्र एका सदस्याने पाव टक्क्याऐवजी जास्त व्याजदर कपात करण्याची गरज असल्याचे मत नोंदविले.
महागाई उच्च पातळीवर असल्यामुळे अगोदर व्याजदर कपातीला फेडरल रिझर्व करणे नकार दिला होता. मात्र बेकारी कमी करण्यासाठी व्याजदर कपात करण्याचा आग्रह ट्रम्प यांनी केला होता. आता आयात शुल्क वाढल्यामुळे अमेरिकेत येणार्या वस्तू महाग होणार आहेत. अशा परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तरीही व्याजदर कपात करण्यात आली.





