Stock Market: व्यापार युद्ध आणि भूराजकीय तणाव या कारणामुळे सरलेल्या वर्षात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सात टक्क्यांनी कमी झाले आहेत. मात्र आखातातील युध्द संपून खनिज तेलाचे दर पूर्ववत झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढण्यास वाव असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. सरलेल्या 2025 – 26 या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5,467 अंकांनी म्हणजे सात टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1,187 अंकांनी म्हणजे पाच टक्क्यांनी कमी झाला आहे. या वर्षात भारतीय स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही जागतिक स्थूल अर्थव्यवस्था मात्र कमालीची कमकुवत झाली. जागतिक पातळीवर महागाईने धुमाकूळ घातला. अनेक देशांची परस्पराविरोधात युद्ध चालू आहेत. रुपयाचे मूल्य या कारणामुळे कोसळल्याने परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री झाली. या कारणामुळे भारतीय गुंतवणूकदारांना या कालखंडात तोटा सहन करावा लागला. सरलेल्या वर्षातील शेवटच्या म्हणजे मार्च महिन्यामध्ये शेअर बाजाराचे जास्त नुकसान झाले. या एकाच महिन्यामध्ये सेन्सेक्स 9,339 अंकांनी म्हणजे 11.48 टक्क्यांनी कोसळला आहे तर वार्षिक पातळीवर हा निर्देशांक केवळ सात टक्क्यांनी कमी झाला आहे. इनरिच मनी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर यांनी सांगितले की वर्षाच्या सुरुवातीला भारतीय कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र नंतर पुरेशा करेक्शननंतर भाव संतुलित पातळीवर आले होते. मात्र नंतर अमेरिकेने भारताविरोधात घेतलेल्या भूमिकेचा आणि त्यानंतर अमेरिका – इराण युद्धाचा भारतीय निर्देशांकावर जास्त परिणाम झाला. भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांनी व परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे निर्देशांक कमी पातळीवर आहेत. मात्र याच कालखंडात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली आहे. नंतर या गुंतवणूकदारांना बराच परतावा मिळण्याची शक्यता आहे. दुसरी सहामाही आशादायक – युद्धाचा भारताबरोबरच जागतिक शेअर बाजारावर पहिले सहा महिने तरी नकारात्मक परिणाम होणार आहे. कारण सध्या खनिज तेलाचे दर 115 डॉलरवर गेले आहेत. भारताला याचा सर्वाधिक फटका बसतो. कारण भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के खनिज तेल आयात करतो. मात्र दुसर्या सहा महिन्यात हा प्रभाव कमी झाल्यानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सध्या तळ शोधत आहेत. एकदा तळ सापडल्यानंतर गुंतवणूकदार एकतर्फी वेगात खरेदी करण्याची शक्यता आहे.