भ्रष्ट कारभाराला कंटाळून दिग्गजांचा सभासद परिवर्तन पॅनेलकडे ओढा

सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून अनेक सभासदांचा ओढा सभासद परिवर्तन पॅनेलकडे आहे. या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी विरोधकांची साथ सोडून कपबशीची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला असून सर्व 21 उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, अखिल सातारा शिक्षक संघ (दोंदे) गट व समविचारी संघटनांच्या सभासद परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात जिल्ह्यात सुरु आहे. बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी सभासदहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देत बॅंकेचे वाटोळे केल्याचा आरोप करत शरद बेस्के, रामभाऊ सोळसकर, संदीप राऊत आदी शिक्षकांनी सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी श्री. थोरात बोलत होते. समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ आदींच्या नेतृत्वाखाली संघटनाविरहित सर्वसमावेशक पॅनेलची निर्मिती करण्यात आली.
राज्य नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षक संघटनेचे राज्य नेते शरद बेस्के यांनी सभासद परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला. आरळे गटातील उमेदवार मनोहर माने व अन्य गुरुजनांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटाचे नेते रामभाऊ सोळसकर, कार्याध्यक्ष संदीप राऊत यांनीही नुकताच सभासद परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला. यावेळी संभाजीराव थोरात, चंद्रकांत यादव, पांडुरंग भरगुडे, नवनाथ भरगुडे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा आघाडी सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सौ. वर्षा ससाणे यांचाही सभासद परिवर्तन पॅनलतर्फे सत्कार करण्यात आला. सर्व मतदारसंघात सभासद परिवर्तन पॅनलला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यामुळे विरोधक सैरभैर झाल्याची प्रतिक्रिया संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केली.





