काबूल – अमेरिकन फौजांनी हवेत केलेला गोळीबार आणि सर्व व्यावसायिक विमानांची रद्द झालेली उड्डाणे… हजारो प्रवाशांनी थेट धावपट्टीवर घेतलेली धाव … त्यानंतर कोणतेही विमान पकडण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड असे काबूल विमानतळावरील सोमवारी चित्र होते…
या विमानतळावरील या भयावह स्थितीचे व्हिडिओ फुटेज माध्यमांध्ये प्रसारित झाले आहे. अधीच खचाखच भरलेल्या विमानात घुसण्यासाठी चालू असणारी धडपड त्यात स्पष्ट दिसत आहे. सरकार पडल्यानंतर कोणत्याही स्थितीत देश सोडण्यासाठी असणारी तगमग यांचे दर्शन घडले.
जे विमानांच्या शिडी चढून जाण्यात यशस्वी ठरले ते इतरांना वर ओढून घेण्याचा प्रयत्न करत होते. तर काही जण विमानांच्या शिड्यांना लटकल्याचे चित्र होते. काखेत कच्ची बच्ची घेऊन घाबरलेले नागरिक हाताला लागेल ते भरगच्च सामान घेऊन देश सोडण्याच्या तयारीत होते.
ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन फौजांनी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर सर्व विमान उड्डाण रद्द करण्यात आली. “त्यांनी हवेत खूप गोळ्या झाडल्या त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे, माझे नाव छापू नका नाही तर मला देश सोडण्यात आडकाठी करण्यात येईल, असे एका ओक्साबोक्शी रडणाऱ्या महिलेने सांगितले.
अमेरिकेच्या गृहविभागाने स्पष्ट केले की, अमेरिकन दुतावासाच्या कर्मचाऱ्यांचे आणि 11/9 च्या हल्ल्यानंतर तालिबान सरकार पाडेपर्यंत अमेरिकेच्या हिताचे काम करणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर सुखरूप होण्यासाठी अमेरिकन फौजा काबूल विमानतळाचे रक्षण करत आहेत.
काबूलमधील अमेरिकेच्या दुतावासाने काबूल विमानतळाकडे अमेरिकन नागरिक आणि अफगाणी नागरिकांनी प्रवास करू नये, असे ट्विट केले आहे. मात्र, त्यानंतरही अमेरिकेशी कोणताही संबंध असलेले – नसलेले हजारो नागरिक बाहेर पडण्याच्या आशेने व्हिसा, तिकीट नसतानाही विमानतळावर धाव घेत आहेत.
अफगाणस्तिानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देश सोडल्यानंतर लगेचच तालिबानच्या नेत्यांनी विमानतळाचा ताबा घेण्याचे आदेश आपल्या योद्धांना दिले होते.
या शहरात रहायची आता आम्हाला भीती वाटत आहे. त्यामुळे आम्हाला हे शहर सोडून जायचे आहे. मी लष्करात नोकरी केली असल्यामुळे तालिबान मला नक्की मारून टाकेल.
– अहमद (एवढेच नाव सांगितले)
अफगाणी नागरिक वय, 25
कॅनडा अफगाणस्तिानातील नागरिकांना आश्रय देण्यास तयार आहे… अमेरिका आश्रय देणअर आहे… त्या देशाचे नागरिकत्व देणार आहे… अशा अनेक अफवा समाजमाध्यमांद्वारे पसरल्या होत्या.