जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची शौर्याकथा सांगणारा ‘फौजी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. यामध्ये बॉर्डर, LOC, लक्ष्य यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. असाच एक स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता.
चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.
‘फौजी’ चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.





