राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहिलेले इमाम यांच्याविरुद्ध ‘फतवा’, इमाम म्हणाले- ‘माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे’

Imam Umer Ahmed – 22 जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम, डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये त्यांचा समावेश होता. आता त्यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सडेतोड उत्तरही दिले आहे.
आपल्या विरोधात जारी केलेल्या फतव्याबाबत उमर अहमद म्हणाले, ‘मुख्य इमाम या नात्याने मला श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते. दोन दिवस विचार करून अयोध्येला जायचे ठरले. हा फतवा काल काढण्यात आला होता पण मला 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे फोन येत आहेत.
‘जे माझा द्वेष करतात ते पाकिस्तानात जा’ –
ते पुढे म्हणाले, ‘मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत ज्यात कॉल करणाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर आणि देशावर प्रेम करणारे मला साथ देतील. मी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे. मी प्रेमाचा संदेश दिला आहे. कोणताही गुन्हा केला नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामाही देणार नाही. धमक्या देणारे त्यांना हवे ते करू शकतात.
फतव्यात काय म्हंटले –
या फतव्यात म्हटले आहे की, ‘राम मंदिरात जाण्यापूर्वी आणि तुमचे वक्तव्य करण्यापूर्वी तुम्हाला असे वाटले नाही का की तुम्ही मौलाना जमील इलियासी यांचे पुत्र आणि मेवातच्या एका प्रसिद्ध उपदेशक कुटुंबातील आहात? तूम्ही कधीपासून इमामांचा नेता झालात? हिंदूंच्या नजरेत चांगले बनायचे होते. हिंदूंना खूश करण्यासाठी तुम्ही गेले.’
‘कोणतीही व्यक्ती तोपर्यंत खरा मुस्लीम बनू शकत नाही, जोपर्यंत त्याच्यात संपूर्ण मानवता नाही. मग मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे असे म्हणायला कितपत अनुमती देता येईल? सन्मान मिळविण्यासाठी मंदिराच्या उद्घाटनात का सामील झालात? एवढेच नाही तर या फतव्यात इमामविरोधात इतर अनेक वैयक्तिक प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यांच्या इमाम असण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
यापूर्वी ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात आलेले डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी म्हणाले होते, ‘हे भारत बदलण्याचे चित्र आहे. आजचा भारत नवीन आणि चांगला आहे. मी इथे प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे. उपासनेच्या पद्धती भिन्न असू शकतात. आपली श्रद्धा नक्कीच भिन्न असू शकते, परंतु आपला सर्वात मोठा धर्म मानव आणि मानवता आहे. चला, आपण सर्व मिळून माणुसकी जपूया.
मुस्लिम धर्मगुरू डॉ. इमाम उमर अहमद इलियासी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (AIIO) चे मुख्य इमाम आहेत. इलियासी यांना ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन भारतातील 5 लाख इमाम आणि सुमारे 21 कोटी भारतीय मुस्लिमांचे धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जाते.
उमर अहमद इलियासी हे इमाम संघटनेचा जागतिक चेहरा आहेत. धर्म, अध्यात्म आणि आंतरधर्मीय संवादाच्या सर्व आंतरराष्ट्रीय मंचांवर संस्थेचे प्रतिनिधित्व करतात. पंजाबच्या देश भगत विद्यापीठाने अलीकडेच डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी या पदवीने सन्मानित केले आहे. एखाद्या मशिदीच्या इमामाला शिक्षणाच्या सर्वोच्च पदाने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.





