इंदापुरात फातिमा शेख अभ्यासिकेचा शुभारंभ; परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वरदान ठरेल: भरत शहा यांचे प्रतिपादन

इंदापूर: राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी इंदापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागण्यासाठी फातिमा शेख अभ्यासिका सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात फातिमा शेख अभ्यासिका वरदान ठरेल, असा आशावाद कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी व्यक्त केला.
इंदापूर शहरात बाबा शॉपिंग सेंटर येथे टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर संचलित फातिमा शेख अभ्यासिकेच्या शुभारंभ (ता.६ जून) रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच इंदापूर शहर व्यापारी संघाचे प्रमुख भरत शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दर्गाह मस्जिद ट्रस्टी अध्यक्ष असदखान जमादार, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, इनायत काझी, समदभाई सय्यद, अबुल पठाण, आरीफ पठाण, आसिफ बागवान, शकिल सय्यद, आरशद सय्यद, प्रशांत उंबरे, अक्षय सुर्यवंशी, अजिक्य जावेद, जावेद शेख,
यांच्यासह शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक घरातील विद्यार्थी हा गुणवत्ताधारक बनला असून एमपीएससी, यूपीएससी व शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत अभ्यासू रित्या उतरत आहे. प्रत्येक वर्षी इंदापूर शहरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. नव्याने उभारलेल्या फातिमा शेख अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेच्या व इतर धार्मिक अध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, क्षेत्रातील साहित्याची कदापी आम्ही कमतरता पडू देणार नाही, असा शब्द भरत शहा यांनी दिला.
मुस्लिम समाजातील युवकांनी एकत्र येऊन इंदापूर शहरात अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात. आगामी काळात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणखी अद्यावत उपक्रम राबवावेत अशीही अपेक्षा व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी व्यक्त केली.





