Pimpri | बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ

आळंदी: देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥
नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कालवलें ॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण । तैसेंचि गगन कालवलें ॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठेवा निरंतर ॥
तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥
पहाटे 3 वाजता प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक, 5 ते 9: 30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, 7ते 9 हैबतबाबा पायरी पुढे ह भ प हैबतबाबा आरफळकर यांचे तर्फे कीर्तन, संस्थानतर्फे विणा मंडपामध्ये कीर्तन, भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन, 9 ते 12 ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन अश्या हरीनाम गजरात दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या दरम्यान घंटानाद ,पुष्पवृष्टी व आरती होऊन माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 विणा मंडपात ह भ प सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 9 ते 11.30 श्रींची गुरुवार पालखी, 11.30 ते 12 धुपारती, रात्री 9:30 ते 11:30 कारंजा मंडपा मध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांचेतर्फे भजन, रात्री 12 ते 4 हैबतरावबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर असे कार्यक्रम समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात संपन्न झाले. कीर्तनात नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले होते.
यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, खासदार संजय जाधव, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, चैतन्य महाराज कबीरबुवा, मानकरी साहिल कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, डि.डि.भोसले, राम गावडे, रोहीदास तापकीर, संजय घुंडरे, अजित वडगावकर, राहुल चव्हाण, वैजयंता कांबळे, पुष्पा कुऱ्हाडे, सागर रानवडे, महेश कुऱ्हाडे, अमोल घुंडरे, अमोल वीरकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, संतोष भोसले, विष्णू वाघमारे तसेच वारकरी भाविक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कार्तिकी वारीत काळात अभिषेक, आरती, नैवेद्य असे नित्योपचार वगळता २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. तसेच लाखो भाविकांनी महाद्वारातून मुख दर्शन घेतले. समाधी सोहळ्यानिमित्त यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
वारकरी परतीच्या वाटेवर –
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा शनिवारी (दि. 23) सुरू झाला होता. तेव्हापासून आळंदीत वारकरी दाखल होत होते. दशमीच्या रात्री (दि. 25) आणि एकादशीला (दि. 26) तीन लाखापेक्षा जास्त वारकरी आळंदीत दाखल झाले. द्वादशीला सकाळचे भोजन करून लाखावर भाविक गावी परतले तर आज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर 90 टक्केपेक्षा जास्त भाविक गावी परतले. शनिवारपासून आजपर्यंत 5 लाखापेक्षा जास्त भाविकांनी आळंदीला भेट देऊन माऊलींचे दर्शन घेतले.





