मुलीचे लैंगिक शोषण करणारा बाप जेरबंद

सातारा: शहरालगत असणाऱ्या शाहूपुरी परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिला मारहाण करणाऱ्या बापाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी स्वत: पीडित मुलीनेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात बापाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी बापावर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, स्वत:च्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करुन याची माहिती कोणाला सांगितली तर तुझे शिक्षण बंद करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्यामुळे शाहूपुरी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी पंधरा वर्ष अकरा महिन्याची असून ती आपल्या कुटुंबासमवेतच राहते. रात्रीच्यावेळी घरातील सर्वजण झोपले की बाप तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण करायचा. याप्रकाराला तिने विरोध केल्यानंतर तो तिला मारहाण देखील करायचा. या प्रकाराची माहिती जर कोणाला दिली तर अथवा कोणाला काही सांगितले तर तुझे शिक्षण बंद करण्याची धमकी देवून मारहाण ही करत होता.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीनेच मंगळवार, दि. २ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बापाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर बापावर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावतीने बापाच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी सचिन जाधव यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.





