नेवासा बुद्रुक शिवारात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एक युवक जागीच ठार

नेवासा – नेवासा – श्रीरामपूर राज्य मार्गावरील नेवासा बुद्रूक शिवारात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार (दि.12 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, भोकर (ता. श्रीरामपूर) येथील किशोर बबन आहेर (वय २६) आणि त्याचा मित्र कैलास उल्हास अमोलीक हा वडाळा (बहिरोबा, ता.नेवासा) येथे मित्राच्या लग्नाला आपल्या प्लॅटिना दुचाकीवरुन वडाळा (बहिरोबा) येथे जात असतांना नेवासा बुद्रूक शिवारात ट्रकने (क्रमांक एम.एच.16 ए.ई.9207) दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये कैलास अमोलीकच्या अंगावरुन ट्रक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर किशोर बबन आहेर (वय २६) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
जखमी आहेर याच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक अप्पासाहेब लक्ष्मण साबळे रा.देवटाकळी (ता.शेवगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


