शिरूर : बीएमआर कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्टच्या वादातून एका तरुण चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शिरूर बायपासवरील महाजन मळा परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत वैभव बाळासाहेब काळे (वय 22, रा. कडूस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हा युवक गंभीर जखमी झाला असून, शिरूर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. वैभव काळे हा कारेगाव एस-इन चौकातून बीएमआर कंपनीत जाणाऱ्या कामगारांना घेऊन पुणे-अहमदनगर महामार्गावर जात असताना, शिरूरमधील संग्राम हॉटेलसमोर पांढऱ्या रंगाची ग्लांझा (MH-12-VC-9887) ही कार आडवी लावून त्याचा मार्ग रोखण्यात आला. त्या गाडीतून दोन इसम खाली उतरले. एकाने गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळी हाफ पॅन्ट, तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व पॅन्ट घातलेली होती. त्यांनी वैभव काळे याला गाडीतून खाली ओढून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर गुलाबी टी-शर्टधारी इसमाने गाडीमधून लोखंडी रॉड काढून काळे यांच्या गाडीची समोरील काच फोडली. यानंतर तिघांनी मिळून काळे याचा पाठलाग करून शिरूर बायपासवरील महाजन मळा परिसरात गाडी थांबवली. तेथे लाल रंगाची टोपी असलेला हुडी परिधान केलेला तिसरा इसम आला. या तिघांनी मिळून काळे व त्याच्या सोबत असलेल्या कामगारांना दम देत म्हटले, बीएमआर कंपनीमध्ये आधी आमचा कॉन्ट्रॅक्ट होता. तुम्ही कळमकरच्या कॉन्ट्रॅक्टखाली काम करता, ते मी बघतोच!” असे म्हणत त्यांनी काळे याला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर गुलाबी शर्टधारी इसमाने रॉडने काळे यांच्या डाव्या पायावर तीन ते चार वेळा जोरात वार केले. या हल्ल्यात त्यांचा डावा पाय मोडला असून पाठ, छाती आणि हातांवर जखमा झाल्या आहेत. “पुन्हा इकडे गाडी भरायला आलास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी गाडीच्या सर्व काचा फोडून मोठे नुकसान केले. जखमी वैभव काळे याला त्याचा चुलत भाऊ सौरभ काळे याने विघ्नहर्ता हॉस्पिटल, शिरूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्याचा पाय मोडल्याचे व अंगावर मार लागल्याचे निदर्शनास आणले आहे. या प्रकरणी संदीप दळवी, सोन्या गव्हाणे,अक्षय पवार सर्व रा. आण्णापूर, ता. शिरूर या आरोपींची ओळख पटली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अंमलदार पो.हवा कळमकर हे पुढील तपास करत आहे. लेबर कॉन्ट्रॅक्टच्या वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी वैभव काळे याचा विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, शिरूर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत आहे.