मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी

खालापूर – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज, शनिवार (दि. २४ मे) रोजी दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी असल्याने द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या अधिक होती. दरम्यान द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ३७ म्हणजेच खोपोली फुडमॉल जवळ दुपारी चारच्या सुमारास वाहतूक काही कारणास्तव थांबली होती, त्याचवेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक ट्रेलर भरधाव वेगाने आला. या ट्रेलरने इर्टिगा कारला धडक दिली. नंतर सियाझ कार, ह्युंदायी कार आणि बसला ठोकर दिली. त्यानंतर एका स्विफ्ट कारला पाठीमागून जोराची धडक दिली, तेव्हा ही स्विफ्ट कार समोरील बसला जाऊन धडकली.
स्विफ्ट कार बसच्या पाठीमागील केबिनच्या आत घुसल्याने कारमधील प्रवासी अक्षरशः चिरडले गेले. यात स्विफ्ट चालक व दोन महिला गंभीर जखमी झाल्या, परंतु कारमधील अन्य महिला अश्विनी अक्षय हळदणकर (वय अंदाजे ३० वर्षे) आणि सतरा वर्षीय मुलगी श्रेया संतोष अवताडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वसुधा विजय जाधव (रा. कोल्हापूर), सारिका अवताडे (रा. घाटकोपर), सारिका विजय जाधव (९ वर्षे), अविनाश विजय जाधव (३ वर्षे) आणि अक्षय हळदणकर हे जखमी झाले आहेत.
अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यंत्रणांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघात खोपोली पोलीस ठाणे हद्दीत घडला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.





