नंदुरबारमध्ये भीषण अपघात, ७ भाविकांचा मृत्यू; १० जणांची प्रकृती चिंताजनक

नंदूरबार : ऐन दिवाळीत चांदशैली घाटात शनिवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील चांदशैली घाटात पिकअप उलटून हा अपघात झाला. या वाहनातील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला.
या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले.
पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाली. त्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले. अनेकांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस बचाकार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते.





