पुणे जिल्हा | खेड तहसीलसमोर भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – योद्धा माजी सैनिक संघटनेचे साहेबराव जाधव यांचे खेड तालुक्यातील भ्रष्टचाराच्या विरोधासह विविध मागणीसाठी खेड तहसीलदार कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध संविधानिक लढाई माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी सुरु केली आहे. खेड तहसीलदार कार्यालयापुढे दि. 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत त्यांनी धरणे आंदोलन केले तर शनिवारी (दि. 7) गणेश चतुर्थी पासून उपोषण सुरु केले आहे.
त्यांनी सरकारकडे सर्व तहसीलदार कार्यालयात सरकारी मोडी लिपी वाचकाची नियुक्ती व्हावी. 46 हजार कुणबी नोंदी शोधल्या मग त्या लपवून का ठेवल्या याचा खुलासा होणेबाबत, गाव निहाय प्रमाणित यादी करून प्रत्येक गावाला का दिल्या नाहीत. यामागे कुणाचा फायदा करण्याचा हेतू आहे.
शासकीय कर्मचार्यांनी केलेल्या चुका आणि त्यासाठी त्या सुधारण्यासाठी सामान्य लोकांनी विलंब माफी का मागायची ? शासकीय कर्मचार्यांकडून झालेल्या महसुली चुका या केवळ एका अर्जाच्याआधारे संबंधित विभागातील कर्मचार्यांनी सुधाराव्यात.
रेकॉर्ड रूममधून 24 तासांच्या आत अर्ज आल्यावर सर्वसामान्यांना कागदपत्रे मिळावेत. खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसुली प्रकरणे पेंडिंग आहेत म्हणून शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या वाढवावी यासाठी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला स्थानिक नागसरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे





