Fastest T20 Hundred : टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाज हे झंझावाती पद्धतीने शतके झळकावत असतात. आत्तापर्यंत, व्यावसायिक टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने आयपीएल (IPL) 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळताना केवळ 30 चेंडूत शतक पूर्ण केले होते. आता भारतीय वंशाचा खेळाडू साहिल चौहानने एस्टोनियाकडून खेळताना अवघ्या 27 चेंडूत शतक पूर्ण करून इतिहास रचला आहे. सध्या, एस्टोनिया सायप्रसच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 6 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. आतापर्यंत मालिकेतील दोन्ही सामने एस्टोनियाने जिंकले आहेत.
ख्रिस गेलचा विक्रम निघाला मोडीत…
ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये 30 चेंडूत शतक झळकावले आहे. आता 17 जून 2024 रोजी एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान सायप्रसने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात एस्टोनियाचे पहिले 2 विकेट अवघ्या 9 धावांत पडल्या. त्यानंतर साहिल चौहान (Sahil Chauhan) फलंदाजीसाठी क्रिजवर आला, त्याने येताच चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू केला. चौहानने अवघ्या 27 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि संपूर्ण सामन्यात त्याने 41 चेंडूत 144 धावांची तुफानी खेळी खेळली. 144 धावा करताना त्याने 18 गगनचुंबी षटकार आणि 6 चौकारही लगावले.
सर्वात वेगवान भारतीय शतक कोणाचे आहे?
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्यामध्ये भारतीय खेळाडूचे नाव ऋषभ पंत आहे. 2018 मध्ये आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत दिल्लीकडून खेळताना पंतने हिमाचल प्रदेशविरुद्ध 32 चेंडूत शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव रोहित शर्मा आहे. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्येही गेला पुढे…
आपल्या खेळीच्या जोरावर साहिलने जगातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत हा विक्रम नामिबियाच्या जॉन निकोल लॉफ्टी आयटनच्या नावावर होता ज्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये नेपाळविरुद्ध 33 चेंडूत शतक झळकावले होते. यानंतर कुशल मल्लाने 34 चेंडूत ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर डेव्हिड मिलर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी टी-20 मध्ये 35 चेंडूत शतके ठोकली आहेत.
एस्टोनियाचा मोठा विजय….
तत्पूर्वी, सायप्रसने दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सायप्रसने प्रथम फलंदाजी करताना तरनजीत सिंगच्या 17 चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने केलेल्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत सात गडी बाद 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात एस्टोनियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 40 धावांत संघाने तीन विकेट गमावल्या. मात्र, साहिल चौहानने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सायप्रसविरुद्धचा सामना तर जिंकलाच शिवाय टी-20मध्ये नवा विक्रमही रचला. साहिलच्या या शानदार खेळीच्या जोरावर एस्टोनियाने 13 षटकांत चार गडी गमावून 194 धावा करत विजय मिळवला.