पिंपरी | शेती परवडेना…! चिखलणीसाठी ट्रॅक्टरचे ताशी दर १७०० च्या घरात

कान्हे, (सोपान येवले) – यांत्रिकी शेती करा, असा आग्रह एकीकडे कृषी विभाग धरत आहे. दुसरीकडे यंत्रांवर अवलंबून राहिलेल्या शेतकऱ्यांना भात शेती परवडेना झालीये. असे विरोधात्मक चित्र सध्या मावळ तालुक्यात ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात सध्या भात लागवडी वेगात सुरू आहेत.
पारंपारिक भात शेतीत आता यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला असून पूर्णपणे यंत्रांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु या शेतकऱ्यांना देखील आता शेती परवडत नसल्याची ओरड ऐकू येऊ लागलीये. याचंच एक उदाहरण म्हणजे चिखलणीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि त्यांचे वाढलेले दर.
यंत्रावरील अवलंबित्व वाढले…
शेतीसाठी बैलजोडी हे चित्र पूर्वी मावळातील गावागावात दिसायचे. आता मात्र घरातील गोठे गायब झालेत. दावणीची जनावरे दिसेनासी झालेत. बैलांवर अवलंबून असलेल्या शेतीचे प्रमाण घटले असून शेती तर होतीये मात्र ती ट्रॅक्टर सारख्या यंत्रावर अवलंबून आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असल्याने मावळ तालुक्यात भात लागवडी वेगात सुरू आहेत.
नाणे मावळ, पवन मावळ, आंदर मावळ भागात भात लागवडी जोमाने सुरू आहेत. तालुक्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करण्याचे प्रमाण कमी आहे. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने भात लागवडीसाठी आवश्यक चिखलणी होताना दिसते. कमी वेळात काम होत असल्याने शेतकरी यालाच प्राधान्य देत आहेत.
ट्रॅक्टर मालक ठरवतील तो दर –
चिखलणीसाठी ट्रॅक्टरवर अवलंबून असणाऱ्य शेतकऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत ट्रॅक्टर मिळत नाहीत. तर दुसरीकडे ट्रॅक्टर मालकांनी चिखलणीसाठी ट्रॅक्टरचे तासाचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कुठलेही बंधन नसल्याने ट्रॅक्टर मालक मनमानी करत चिखलणीसाठी ट्रॅक्टरचे दर वाढवत आहेत. पूर्वी जिथे ५०० ते ७०० रूपये दर होते, तिथे आता १५०० त १७०० रूपये दर हे चिखलणीसाठी ट्रॅक्टर मालक घेतात. ट्रॅक्टरच्या प्रकारानुसार दर बदलतात, असे शेतकरी सांगत आहेत.
शेतीतील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक-
पूर्वी पशूधन आणि अंगमेहनतीवर शेती अवलंबून होती. आता ट्रॅक्टर आदी यंत्रांचा वापर वाढलाय. ट्रॅक्टरचे दर दिवसेंदिवस वाढू लागलेत. मजुरांसाठी लागणारी मजूरी, ट्रॅक्टरचे भाडे आणि खतांचे पैसे एकत्रित केले तर येणाऱ्या उत्पन्नापेक्षा कधीकधी खर्च अधिक असतो. मात्र वाडवडिलांची शेती ओसाड राहू नये त्यासाठी ती करत आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
डिझेल, मजुरी वाढल्याने दर वाढले –
ट्रॅक्टरचे ताशी दर वाढलेत हे खरे आहे. परंतु त्याची कारणे देखील अनेक आहेत. आता पूर्वीपेक्षा डिझेलचे दर वाढले आहेत. ट्रॅक्टरवरील चालक ड्रायव्हर देखील जास्त पैसे घेतात. ट्रॅक्टरचा मेन्टनन्स असतो. त्यामुळे ट्रॅक्टरचा ताशी दर वाढवला जातो, असे ट्रॅक्टर मालक सांगतात.





