पिसुर्टी परिसरात चोरीचे प्रमाण वाढले
वाल्हे – पिसुर्टी (ता. पुरंदर) येथे डाळिंब पीक जोरात आले आहे. तसेच श्रावण महिन्यात डाळिंबाला चांगलाच भाव मिळत असताना परिसरामध्ये डाळिंब चोरांनी शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. चोरटे दिवसा छुप्या मार्गाने शेतात घुसून डाळिंबाची चोरी करीत आहते.
या प्रकारणी दीपक चोरमले (वय 34, रा. पिसुर्टी) यांनी वाल्हे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील शेत जमिनीच्या गट नंबर 184 मध्ये असणाऱ्या डाळिंबाच्या बागेत पहाटे साडेपाचच्या सुमारास 5 ते 6 चोर डाळिंबाची तोड करीत होते. मात्र, याची चाहूल चोरमले यांना लागली. त्यांनी आरडाओरडा करताच चोरट्यांनी तीन दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी हिरो होंडा स्प्लेंडर (एम.एच. 42 ए.एम. 6502), बजाज डिस्कव्हर (क्रमांक नाही) व हिरो कंपनीची मोटारसायकल (एम.एच. 11 बी.टी. 9168) जप्त केल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार हनुमंत गार्डी, पोलीस नाईक संदीप पवार व एस. एम. हिरगुड करीत आहेत.