Farmer News : शेतकरी ६ डिसेंबरला दिल्लीकडे करणार कूच; तब्बल २९३ दिवसांपासून आंदोलन सुरूच

Farmer News – पंजाब आणि हरियाणा दरम्यानच्या सीमेवर फेब्रुवारीपासून तळ ठोकून असणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यांनी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शेतमालासाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी द्यावी या प्रमुख मागणीचा समावेश आहे. केंद्र सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी फेब्रुवारीतच दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना सुरक्षा दलांनी रोखले. त्यामुळे २९३ दिवसांपासून शेतकरी आंदोलक शंभू आणि खनौरी या सीमा भागांत ठाण मांडून आहेत. इतके दिवस उलटूनही तोडग्यासाठी केंद्र सरकारने चर्चेसाठी पुढाकार न घेतल्याबद्दल शेतकरी आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
आता गटागटाने दिल्लीकडे पायी कूच करण्याचे त्यांनी ठरवले आहे. पहिला गट येत्या शुक्रवारी रवाना होईल. त्या गटात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नंतर जाहीर केली जाणार आहे.
तो गट जीवनावश्यक वस्तूंसह शांततेने दिल्लीकडे वाटचाल करेल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत शेतकरी आंदोलकांची पदयात्रा मार्गक्रमण करेल. त्यांचा मुक्काम रात्री रस्त्यालगतच असेल.





