Nagar : जलसंपदा खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

राहुरी : पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जलसंपदा खाते मिळाले, याचे समाधान असून शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी आपण पार पाडणार आहोत. राहुरीतील जनतेने आ. शिवाजीराव कर्डिले यांचा ऐतिहासिक विजय केला.आता मूलभूत विकासाचे प्रश्न सोडवून राहुरीच्या विकासासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहुरी येथे ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ.शिवाजीराव कर्डिले यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते अँड. सुभाषराव पाटील होते.
विखे पाटील म्हणाले की, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांच्या स्वप्नपूर्तीसाठी जलसंपदा खाते आपण स्वीकारले असून, त्या माध्यमातून चांगले काम शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. दुष्काळ कायम स्वरुपात हटवू. मुळा धरणातील गाळ काढून मानोरी बंधाऱ्यासह इतर बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली जाणार आहे. मुळा धरण दरवाजा उंचीच्या प्रस्तावाने मुळा धरण साठवण क्षमता वाढणार आहे, याचा विचार केला जाईल. पाणी वापर संस्था राजकीय अड्डा बनल्या असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी वापर संस्था बरखास्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण विजयी झालो आहे. विकासकामे पूर्ण करण्याची आमची जबाबदारी असून पुढील पाच वर्षात सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत.आपण यापूर्वी माजी झालो त्याचे नाही तर आता डॉ.सुजय विखे पाटील माजी झाल्याचे दुःख आहे. नियोजनाप्रमाणे शासकीय कार्यालये, ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल हे विषय मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, आपल्या पराभवापेक्षा कर्डिले यांचा विजय महत्त्वाचा आहे. आता आपण कुठे पदावर बसण्यापेक्षा काही लोकांना घरी बसवण्यातच वेगळा आनंद आहे. राहुरी शहरातील काही लोक सोडून गेले परंतु शहरातील युवकांनी साथ दिली. राहुरी तालुक्यातील कालवे दुरुस्तीसह जलसंपदा खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता नक्कीच न्याय मिळेल. प्रशासकीय कार्यालय इमारतीसह सर्वच विकास कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते अँड. सुभाषराव पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विनायक देशमुख आदींची भाषणे झाली. भाजपा व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ.शिवाजीराव कर्डिले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी राहुरी शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी प्रास्तविक केले.





