पुणे जिल्हा | शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता…

नारायणगाव, (वार्ताहर)- भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि ग्रामीण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१८) दुपारी दोन वाजता पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता, भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनीलतात्या मेहेर यांनी दिली.
पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना योजनेबाबत माहिती देणे आणि हप्त्याचे वितरण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाला वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील तज्ञांमार्फत शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी उद्योजकांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे.





