Satara | सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल

सातारा, (प्रतिनिधी) – विकास सेवा सोसायट्या ह्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा आहेत. जिल्हा बँक आणि सोसायट्या याच शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार आहेत. जिहे येथील स्व.रामराव (नाना) फडतरे वि.का.स.सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
जिहे, ता. सातारा येथील स्व. रामराव (नाना) फडतरे वि.का.स.सेवा सोसायटीला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून हे प्रमाणपत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सोसायटीचे सर्व सभासद आणि ग्रामस्थांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी मुख्य प्रवर्तक चंद्रकांत फडतरे, पै. नरसिंह फडतरे, पदमसिंह फडतरे, सतपाल फडतरे, आनंदराव भोईटे, सुरेश फडतरे, अजित फडतरे, चंद्रहास जाधव, राजेंद्र फडतरे, लाला बापू घाडगे, सूर्यकांत कदम, जितेंद्र सुळके यांच्यासह सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ग्रामीण भागात विकास सेवा सोसायट्यांमुळे अर्थकारणाला चालना मिळत असते. सोसायटीच्या माध्यमातून सभासद- शेतकऱ्यांना विविध आर्थिक योजनांचा लाभ मिळतो. विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून स्व. रामराव (नाना) फडतरे वि.का.स.सेवा सोसायटीने आपला नावलौकिक वाढवावा आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले.





