शेतकरी संघटनांचा 25 सप्टेंबरला भारत बंद

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी 25 सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. शेतकरी आंदोलनाला व्यापक बनवण्याच्या उद्देशातून तो निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आंदोलनाला नऊ महिने पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीच्या सिंघू सीमेवर दोन दिवसीय राष्ट्रीय शेतकरी अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाच्या समाप्तीवेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी बंदची हाक दिली.
मागील वर्षीही 25 सप्टेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पाळला होता. आता पुढील महिन्यातील बंद मागील वेळेपेक्षाही अधिक यशस्वी ठरण्याचा विश्वास संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केला.
आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी मोदी सरकारने शेतकरी नेत्यांशी अनेक फेऱ्यांत चर्चा केली. मात्र, शेतकरी नेते कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम राहिले. तर, सरकारने ती मागणी मान्य करण्यास नकार दर्शवला. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर कायम राहिल्याने आंदोलनाची कोंडी फुटू शकली नाही. मागणी मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे.


