Sadabhau Khot : आठ दिवस कुठे होता? नुसते फोटो काढायला आलात का?” शेतकऱ्यांचा भडिमार अन् सदाभाऊ खोतांचा काढता पाय

सोलापूर : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगाव येथे माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागले. पिके वाहून गेली, घरांत चिखल साचले आणि जनावरांना चारा नसल्याने बळीराजा रस्त्यावर आला आहे.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सदाभाऊंना “आठ दिवस कुठे होता? नुसते फोटो काढायला आलात का?” असा प्रश्नांचा भडिमार करून शेतकऱ्यांनी घेराव घातला. ग्रामस्थांच्या रोषापुढे सदाभाऊंनी हात जोडून काढता पाय घेतला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वादाला नवीन वळण मिळाले आहे.
१६ वर्षांनंतरची पहिली भेट
माढा लोकसभा मतदारसंघातील उंदरगाव गावाने २००९ च्या निवडणुकीत वर्गणी काढून सदाभाऊ खोत यांना २५ हजार रुपये आणि पाचशे पाचशेच्या माळा घालून मतदान केले होते. गावकऱ्यांनी त्यांना लीड दिली होती, पण तब्बल १६ वर्षांनंतर सदाभाऊ आजच उंदरगावात आले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना रस्त्यावरून फिरणाऱ्या सदाभाऊंना शेतकऱ्यांनी अडवले.
“आमच्या घराकडे चला, रस्त्यावर उभे राहून काय उपयोग? आठ दिवस कुठे होता? फोटोसाठी आलात का?” असा सवाल करून त्यांनी सदाभाऊंना घेरले. एका ज्येष्ठ शेतकऱ्याने हात जोडून म्हटले, “सदाभाऊ, आमच्यावर उपकार करा. निवडणुकीत दिलेले पैसे तरी माघारी द्या.”
शेतकऱ्यांनी सांगितले की, सदभाऊंच्या संघटनेने गावासाठी काहीच केले नाही. “आम्ही ५ हजार रुपये वर्गणी दिली, पण १६ वर्षांत एकदाही मदत नाही. आता माघारी जावा, आम्हाला तुमचं काही नको. आमच्या नशिबाने काय होईल ते होईल,” असे ते बोलत होते. जनावरांना वैरणीची सोय, चारा आणि फवारणीची मागणी करताना शेतकऱ्यांनी सांगितले, “तीन दिवसांपासून कलेक्टर ते बीडीओपर्यंत धाव घेत आहोत, पण काहीच होत नाही. खासदारांनी थोडाफार चारा दिला, पण पुरेसा नाही.”
“माघारी जाईन, पण वादविवाद करू नका”
शेतकऱ्यांच्या संतापापुढे सदाभाऊ खोत हताश दिसले. “आम्ही तुमच्याबरोबर आहोत. वादविवाद करून काय उपयोग? तुम्ही माघारी जावा म्हणताय तर जातो,” असे ते म्हणाले. मात्र, शेतकऱ्यांनी पुढे सांगितले, “तुम्ही निवडणुकीला उभे असताना गावाने प्रेम दाखवले, लीड दिली. आता पूरात घर उद्ध्वस्त झाले, जनावर रस्त्यावर बांधली आहेत. माणसे पाहुणचारांकडे पाठवली, पण मदत कोण देणार?” सदाभाऊंनी हात जोडून विनंती केली, पण ग्रामस्थांनी त्यांना सोडले नाही. अखेर ते घाबरून काढता पाय घेतले.





