वाशी : राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी मुंबईत अर्धनग्न आंदोलनासाठी गेलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवारी ता. १२ दुपारी वाशी चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आझाद मैदानावर नेण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मंत्रालयासमोर आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, दीपक सावके, प्रविण मते, राजेश मते, गजानन जाधव, शांतीराम सावके, दीपक सावके, यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी ता. ११ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर सदर शेतकरी मंत्रालय येथे आंदोलनासाठी रवाना झाले. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांचे वाहन वाशी येथील चेकपोस्ट येथे पोहोचल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस व शेतकरी यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. आम्हाला अडवले तर रस्त्यावर आंदोलन सुरू करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. मात्र शेतकऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी या सर्वांनाच ताब्यात घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.