उद्धव ठाकरेंच्या खटाव दौऱ्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा

नुकसानग्रस्त भागाला मदतीची गरज; दौरा फलदायी ठरणार का याची चर्चा
सातारा – कायम दुष्काळी असलेल्या खटाव व माण तालुक्यांमधील शेतकऱ्यांना यंदा झालेल्या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पिके कुजून गेली आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याने पुढची सुगी कशी करायची, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या, दि. 15 रोजी खटाव दौऱ्यावर येत असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा या दौऱ्याकडे लागल्या आहेत. मात्र, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा दौरा शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरणार का, हा प्रश्न आहे.
खटाव व माणमध्ये यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा काही काळ सुखावला होता. मात्र, अतिवृष्टी झाल्याने दोन्ही तालुक्यांमधील ओढे, नाले, नद्या भरून वाहू लागल्या तर शेती पाण्याखाली गेल्याने उभी पिके कुजून गेली. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा व धान्याचा प्रश्न कसा सोडवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना आहे. द्राक्ष बागा करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडेही या पावसामुळे मोडले आहे. त्यांची लाखो रुपयांची गुंतवणूक पाण्यात गेली आहेत.
बॅंकांची देणी, निर्यातीला बसलेला फटका, विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यात केलेली चालढकल यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे कोणता दिलासा देणार, हा प्रश्न आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या खेळात राष्ट्रपती राजवट लागल्याने लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना ठोस काही करता येणार नाही.
मात्र, पार्यायी मार्ग शोधून या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचारात उद्धव ठाकरे यांनी “हा तुमचा शेवटचा दुष्काळ आहे’, असे सांगत खटाव व माणवासीयांना साद घातली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे येथील शेतकऱ्यांना काही ना काही मदत जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर या दोन्ही तालुक्यांमधील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यावर तरी…
सध्या राष्ट्रपती राजवट लागल्याने राज्यात कोणताच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही. मात्र, राष्ट्रपती राजवट फार काळ राहणार नसल्याने सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यावर तरी बळीराजाच्या पदरात मदतीचे दान पडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठाकरे जाणार का शेतकऱ्यांच्या बांधावर?
उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यातील दौऱ्यानंतर मायणी, कातरखटाव, वडूज, पुसेगाव, लोणंदमार्गे पुण्याला जाणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





