Farmer Death : धक्कादायक ! शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू
अवघ्या 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी (Farmer Death) एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात 40 वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Farmer Death : शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी छळल्याच्या घटना समोर येत असून, नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी (Farmer Death) एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात 40 वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. माळकौठा येथील रहिवासी चंद्रकांत शिंदे (40) यांचा हा मृतदेह शहरातील के एफ एंटरप्रायझेस या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळून आला.
माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी आपल्या गरजेपोटी केएफ एंटरप्रायजेस या खासगी फायनान्स कंपनीकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे कर्मचारी (Farmer Death) बुधवारी त्यांना गावातून थेट कंपनीच्या कार्यालयात घेऊन आले होते. मात्र, त्यानंतर गुरुवारी त्यांचा मृतदेह याच फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
केवळ 10 हजारांच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्यांना कार्यालयात डांबून मारहाण केली आणि त्यानंतर बनाव रचण्यासाठी मृतदेह लटकल्याच्या अवस्थेत टांगला, असा आरोप शिंदेंच्या परिवाराने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दुष्काळाच्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दारात कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांनी जाऊ नये, असा राज्य सरकारने सक्त आदेश (Farmer Death) दिला आहे. मात्र, या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






