नवी दिल्ली : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतीचा आत्मा शेतकरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कृषी क्षेत्रात सतत काम करत आहोत. एक काळ असा होता की, भारत अमेरिकेतून अन्नधान्य आयात करत असे. आता भारत अन्नधान्य निर्यात करणारा आघाडीचा देश बनला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली आयोजित तीन दिवसीय पुसा कृषी विज्ञान मेळा २०२५ चे उद्घाटन आज चौहायांच्या हस्ते झाले. या प्रसंगी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक आदी उपस्थित होते. आयसीएआरचे अभिनंदन करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेतीशास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आमची ६ कलमी रणनीती आहे. त्यामध्ये उत्पादन वाढवणे हा प्रमुख मुद्दा आहे. त्यासाठी चांगले बियाणे आयसीएआर तयार करत आहे. शेतकऱ्यांपर्यंत ब्रीडर सीड आणि फाउंडेशन सीड पोहोचतील याची खात्री केली जात आहे. बियाणे पोहोचवण्यासाठी, विज्ञान आणि शेतकरी यांना जोडले जावे लागेल. याला मॉडर्न अॅग्रीकल्चर चौपाल म्हणतात. शिवराज सिंह म्हणाले की, दुसरे मोठे काम म्हणजे उत्पादन खर्च कमी करणे. उत्पादन वाढले की खर्च कमी होतो. या संदर्भातही अनेक योजना आहेत. २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान भागलपूरमधील किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवतील. शेतकऱ्यांच्या खर्चाचीही व्यवस्था आपल्याला करावी लागेल. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. तिसरे काम म्हणजे उत्पादनाला योग्य किंमत देणे. यासाठी, एमएसपीमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांचा गहू , तांदूळ, मसूर, उडीद आणि तूरदेखील खरेदी करेल. शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळावी म्हणून केंद्र सरकार नाफेडमार्फत वाहतूक खर्च देईल अशी आमची योजना आहे. शिवराज सिंह म्हणाले की, जेव्हा सोयाबीनचे दर घसरले तेव्हा बाहेरून येणाऱ्या तेलावरील आयात शुल्क २७.५% पर्यंत वाढवण्यात आले. तांदळाच्या निर्यातीवर बंदी होती, आम्ही ती काढून टाकली आणि निर्यात शुल्क कमी केले. मधला नफा कमी करायला हवा, आम्ही यावर काम करत आहोत. चौथे मोठे काम म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते तेव्हा आम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेद्वारे मदत पुरवतो. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ७ लाख कोटी रुपयांवरून २५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. एक काळ असा होता जेव्हा भारताला अमेरिकेतून पीएल ४८० गहू आयात करावा लागत असे. आज भारत अनेक देशांना अन्न पुरवत आहे. हे आपल्या शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे घडले आहे. आपल्याला असे अनेक प्रयत्न करावे लागतील. एक देश एक निवडणूकचे समर्थन शिवराज सिंह म्हणाले की, अअपल्याकडे निवडणुकांची तयारी ५ वर्षे १२ महिने सुरू राहते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या, नंतर लोकसभा निवडणुका झाल्या, नंतर महाराष्ट्र, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा येथे निवडणुका झाल्या आणि त्यानंतर दिल्ली निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या तयारीत सर्व काम थांबते. जर कायद्यात दुरुस्ती केली गेली आणि सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या तर काय होईल? म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाच वर्षांनी एकदा घ्याव्यात, जेणेकरून प्रत्येकजण जनतेची सेवा करण्यात गुंतून राहू शकेल.