शेतकरी आंदोलनाचा बासमती तांदळाच्या वाहतुकीला फटका

परिणामी भावात क्विंटलमागे सुमारे 1 हजार रुपये वाढ
पुणे – शेतकरी आंदोलनाचा फटका बासमती तांदळाच्या वाहतुकीला बसला आहे. महिनाभरापासून पंजाब हरियाणा सीमेवर सुरु असलेल्या या आंदोलनामुळे तांदळाच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने बासमती तांदळाच्या भावात क्विंटलमागे सरासरी 1 हजार रुपयांनी वाढ झाल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.
यंदा बासमती तांदळाचे उत्पादन चांगले असले तरी शेतकरी आंदोलनाचा फटका या तांदळाला बसला आहे. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील विविध बाजारपेठांत आवश्यक त्या प्रमाणात पोचू शकणार आहे. यंदाचा हंगाम 15 नोव्हेंबरला सुरु झाला. हंगाम सुरु झाल्यानंतर काहीच दिवसांनी हे आंदोलन सुरु झाले. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधून होणारी तांदळाची वाहतूक विस्कळीत झाली. राइस मिल धारकांनीही धोका पत्कारून तांदळाची वाहतूक करण्यास नकारघंटा दिल्याने पुरेशा प्रमाणात बासमती व त्याचे सर्व उपप्रकार मिळणे अशक्य बनले आहे.
बासमती तांदळाला देशाबरोबर आंतराष्ट्रीय बाजारातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हल्ली गेल्या काही वर्षापासून पारंपारिक बासमती तांदूळ घेण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्या ऐवजी स्टीम बासमती तांदळाचे प्रकार जसे; 1121, 1509, 1401 , शेला बासमती आदी प्रकारांना मागणी वाढत चालली आहे. या तांदळाची लांबी पारंपारिकपेक्षा जास्त असल्यामुळे हॉटेल, केटरिंग सारखे व्यावसायिकही यांकडे आकर्षीत झालेले आहेत.
यंदाचा हंगाम गेल्या वर्षीपेक्षा कमी भावाने सुरु झाला. 15 नोव्हेंबरला सिजनच्या सुरुवातीला 1121 बासमती तांदळाचे भाव जागेवर 6000 ते 6500 रुपयांपर्यंत होता. आता त्यात 1 हजार रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ झाली आहे. सध्या त्याचा भाव 6500 ते 7500 रुपये प्रति क्विंटल आहेत. तर पारंपरिक बासमती तांदळाचे भाव सिजनच्या सुरुवातीला 9000 रुपये प्रति क्विंटल होता. तो आता 10000 रुपये क्विंटल झाला आहे. यामुळे स्थानिक बाजारातही पारंपरिक बासमती, 1121 बासमती व इतर बासमती मध्ये सुद्धा 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे.





