Farmer Success | एका एकरात १८ टन वांगी! ; आधुनिक शेतीने शेतकऱ्याला दिला लाखांचा लाभ

प्रभात वृत्तसेवा
वीसगाव खोरे – नाटंबी (ता.भोर) येथील युवा शेतकरी संग्राम रामचंद्र जेधे यांनी भात व ऊसाच्या शेतीला फाटा देऊन मागील वर्षी भात पीक घेतलेल्या खाचरातील एक एकर शेतात आधुनिक पद्धतीने वांग्याची शेती करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. १८ टन विक्रमी उत्पादन घेतले असून निव्वळ फायदा अडीच लाख मिळाला आहे.भात व ऊसाबरोरच अल्पप्रमाणात बागायत शेती करणाऱ्या जेधे यांनी सायबेज आशा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच धाडसाने निर्णय घेत वांग्याची शेती केली.
एक एकराच्या भात खाचरातील २० गुंठे जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करून मल्चिंग पेपरचा वापर करत १९ बेड तयार केले. १० जानेवारीला सायबेजने दिलेल्या अंकुर ७८६ या जातीच्या २ हजार ५०० रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. दोन महिन्यांनंतर १५ मार्च रोजी पहिल्या तोड्यात मिळालेल्या ५० किलो वांग्यांना किलोला दहा रुपये भाव मिळाला.
पुढे वांग्याची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने दिवसाआड तोडे होऊ लागले. आठवड्यात टनभर माल निघू लागला. सुरुवातीला मिळत असलेल्या १० ते १५ रुपये भावात वाढ होऊन मे महिन्यापासून ३० ते ३५ रुपये प्रति किलोस भाव मिळाला. मागील आठवड्यापासून चारशे किलो वांग्याची तोड होत आहे. नोव्हेंबरपर्यंत तोडे सुरू राहिल्यास उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
सायबेज आशा संस्थेने नाटंबी गाव दत्तक घेतले असून शेतकऱ्यांना मदत करत आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. सायबेजकडून ड्रीप, मल्चिंग पेपर, रोपे, चिकट सापळे व तांत्रिक मार्गदर्शनाची मदत करण्यात आली. संस्थेकडून मंगेश सोनवणे, सागर सहाणे,प्रदीप दळवे यांचे तर नाशिकचे कृषीतज्ञ प्रमोद देवरे,बारामती कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जेधेंना कुटुंबाची आणि मित्रांची मदत मिळाली.
आंतरपिकापासून मोठे उत्पन्न..
“पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या बागायत शेतीतून मिळालेल्या चांगल्या उत्पादनाबाबत समाधानी आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यावर चांगल्या प्रतिचा भाव मिळून चांगले उत्पन्न मिळवू शकतो याची खात्री यातून मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मूळ शेतीबरोबरच आंतरपीक घेऊन घसघशीत उत्पादन मिळवावे.”
– संग्राम जेधे, प्रयोगशील शेतकरी, नाटंबी

