पुणे जिल्हा | कुरकुंडीत शेतकरी कुटुंबास मारहाण

आंबेठाण, (वार्ताहर) – कुरकुंडी (ता. खेड) येथे रात्री 11 वाजता माथराणी मायलिन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माणसांकडून शेतकरी अर्जुन सावळेराम राळे व त्यांच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणे राळे यांनी महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून रानमाळा येथे मथराणी मायलिन इन्फ्रा प्रा. लि. ही क्रशरची मशीनची कंपनी असून ते बेकायदा कुरकुंडी या गावातून राळे वस्तीवरील शेतकर्यांच्या रस्त्यावरून मोठमोठे हायवा ट्रक ये-जा करत आहेत. या मागे सुद्धा आम्ही हे ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांनी आम्हाला कधीच जुमानले नाही, शिवाय दमदाटी व दादागिरीची भाषा या कंपनीच्या माणसांकडून कायमच होते.
त्यामुळे होणार्य त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत. आमचे घर एका शेवटच्या टोकाला असून तिथे विशेष लाइटची सोय नाही शिवाय रोजचे 100 ते 150 ट्रकची वर्दळ आमच्या खासगी रस्त्यावरून असते भविष्यात दुर्गटना घडली तर सर्व जबाबदारी कंपनी मालक व कंपनीतील कर्मचा-यांची असणार आहे. तरी पोलिसांनी लवकरात लवकर कठोर कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा, असे राळे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
माझी माणसे त्या तिकडून मोटरसायकलवर रात्रीच्या वेळेस जात असताना अर्जुन राळे रात्री रस्त्यावरच उभे होते व त्यांच्यामध्ये काही कारणांवरून बाचाबाची झाली त्यामध्ये अर्जुन राळे यांनी माझ्या माणसांना प्रथम मारहाण केली तर संरक्षणात माझ्या माणसांकडून त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. आम्ही लवकरात लवकर या रस्त्याचा तोडगा काढू व विषय मिटून टाकू. – राहुल पाटील, व्यवस्थापक, मथराणी मायलिंग इन्फ्रा प्रा. लि.

