मुंबई – प्रसिद्ध गायक ‘बप्पी लहरी’ यांचे आज (दि. १६) निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण बप्पीदा खऱ्या अर्थाने १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आले. या चित्रपटातील त्यांची सर्वच गाणी प्रचंड गाजली आहेत. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे.
बप्पी लहिरी यांचं नाव नेहमी दोन गोष्टींशी जोडण्यात आलं आहे. एक गाण्यातील वेगळेपण आणि दुसरं सोनं… बप्पी दांचं सोन्याप्रति असलेलं प्रेम सर्वांनाच माहितेय. आणि त्याचमुळे का होईना त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून संबोधले जायचे. आपण इतकं सोन का घालतो याच सुद्धा उत्तर स्वतः बप्पीदांनं दिल होतं.
दरम्यान, बप्पी लहरी यांच्या याच स्टाइलवर सर्वांना वेड लावणारा पॉप स्टार ‘मायकल जॅक्सन’ सुद्धा फिदा झाला होता. एवढे नाहीतर मायकल जॅक्सन याने स्वतः त्याच्या लाईव्ह शोमध्ये बप्पी लहरी यांना बोलावले होते. एकदा मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. तेव्हा त्याची भेट बप्पी लहरी यांच्याशी झाली. या विषयी स्वत: बप्पी लहरी यांनी एका प्रसिद्धी टीव्ही कार्यक्रमात सांगितले होते.
“जेव्हा तो मुंबईत आले होते. तेव्हा मी एका जागी बसलो होतो. मायकल जॅक्सन माझ्याकडे आला तेव्हा त्याची नजर माझ्या गळ्यातील गणपतीच्या चेन वर पडली.’ तो म्हणाला- ‘फॅन्टॅस्टिक, तुझं नाव काय आहे? तुमची चेन अप्रतिम आहे.’ पुढे मायकल जॅक्सनने त्यांना विचारले की ‘तुम्ही कंपोजर आहात का? मी म्हणालो हो मी कंपोजर आहे. डिस्को डान्सर हे माझं गाणं आहे. जसं मी डिस्को डान्सर बोललो तसं मायकल जॅक्सन म्हणाला, की मला तुझं जिम्मी-जिम्मी गाणं प्रचंड आवडलं होतं. असं स्वतः बप्पी लहरी यांनी सांगितलं होत.