मुंबई -पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. सोमवारी पुन्हा एकदा पंजाबचे फलंदाज सपशेल ठरले. कोलकात्याविरुद्ध पंजाबचा संघ शंभरीही पार करणार नाही असं वाटत असताना, ख्रिस जॉर्डनने पंजाबची लाज राखली. शेवटच्या तीन षटकांत फटकेबाजी करत पंजाबच्या धावफलकावर त्याने 123 धावा लावल्या.
दरम्यान, पंजाबकडे तगडे फलंदाज असतानाही ते मोठी धावसंख्या उभारू शकत नाही, याचं शल्य क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये आहे. मात्र, कालच्या सामन्यात फॅन्सच्या निशाण्यावर आला पंजाबचा कर्णधार के. एल. राहुल त्याच्या फलंदाजीतल्या अपयशाने फॅन्स त्रस्त आहेत.
अखेर “याला संघाबाहेर ठेवलं पाहिजे’, अशी मागणी काही फॅन्सनी ट्विटरवरून केली आहे. एकाने तर थेट राहुलला “पाणी द्यायला ठेवलं पाहिजे’, असंच म्हटलं. राहुलचा फ्लॉप परफॉर्मन्स सोमवारच्या सामन्यातही त्याने कायम ठेवला. कोलकाताविरुद्ध तो डावाची सुरुवात करायला मैदानात उतरला. 20 चेंडूंचा सामना करताना त्याने केवळ 19 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.
आज मोठी खेळी करेल असं वाटत असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याने सुनील नरेनला सोपा झेल दिला.
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात राहुल अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याला पंजाबच्या फॅन्सनी ट्रोल केलं. पंजाबच्या संघात अनेक मोठी नावे आहेत पण मैदानावर प्रदर्शन करण्यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत.
पंजाबकडे सलामीवार म्हणून मयांक अग्रवाल आणि के एल राहुलसारखी तगडी जोडी आहे, जी दुनियेतील कोणत्याही गोलंदाजीचा समाचार घेण्यास पात्र आहे.
ख्रिस गेलसारखा युनिव्हर्स बॉस आहे की जो काही ओव्हर्समध्ये सामन्याचं चित्र पालटून टाकत होत्याचं नव्हतं करून ठेवण्याची क्षमता बाळगतो. नंतर निकोलस पूरनसारखा आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडू आहे जो काही बॉलमध्येच झंझावाती खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे.