प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना अश्रु अनावर; चाहत्यांना आवाहन करत म्हणाले…

Vishnu Manohar | शेफ विष्णू मनोहर जगभरात प्रसिद्ध आहे. नुकतेच त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे ‘मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर’ हे फेसबुक पेज हॅक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या पेजवर रेसिपी पोस्ट केल्या जात होत्या त्यावर हॅकर्सकडून अश्लील कंटेन्ट पोस्ट करण्यात आले आहे. यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला असून अश्लील मजकुरामुळे चाहत्यांचे गैरसमज होत असल्याने विष्णू मनोहर व्यथित झाले. यावेळी त्यांना भर पत्रकार परिषदेत अश्रु अनावर झाले.
फेसबूक पेज हॅक झाल्याची तक्रार विष्णू मनोहर यांनी सायबर पोलिसांकडे दिली होती. मात्र, दहा ते बारा दिवस लोटून अद्यापही त्यांचं पेज रिकव्हर करण्यात न आल्यामुळे या पेजवरुन अश्लिल कंटेट सातत्यानं पोस्ट होत आहे. याचाच मानसिक त्रास सहन होत नसल्याचं सांगताना विष्णू मनोहर यांना भर पत्रकार परिषदेत रडू कोसळलं. अशा पद्धतीने माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा हॅकर्सला पोलीस आणि सरकारने धडा शिकवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अद्यापही अकाउंट रिकव्हर नाही
दरम्यान, यासंदर्भात त्यांनी नागपूर, बंगळूर, मुंबई, पुणे, तसंच अमेरिकेतही फेसबुककडे यासंदर्भात तक्रार दिलेली आहे. फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाशीही त्यांनी संपर्क साधला. मात्र, अद्याप हे अकाउंट रिकव्हर होऊ शकलेलं नाही. या 2,000 रेसिपी असलेल्या पेजवर लाखो फॉलॉवर्स होते. मात्र, गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये फॉलोवर्सची संख्या घटली असून युजर्स या पेजला अनफॉलो करत आहेत.
तसेच अनेक जण त्यांना फोन आणि मेसेजद्वारे सातत्याने होत असलेल्या अश्लील पोस्टबाबत प्रश्नही विचारत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या लिंकवर क्लिक केल्यास संबंधित व्यक्तीचं अकाउंट हॅक होऊ शकतं. त्यामुळे या लिंकवर क्लीक करु नये, असं आवाहनही विष्णू मनोहर यांनी चाहत्यांना केले आहे.
हेही वाचा:
योगायोग: पक्षप्रवेश वाढदिवस एकाच दिवशी; धंगेकर शिवसेनेत जाताच शिंदे म्हणाले “आता लोकांना कळेल….”





