सोलापूर : सोलापूरच्या लष्कर परिसरातील लोधी गल्ली येथे रविवारी (३१ ऑगस्ट ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. बेडरपूल येथील एका सात बाय दहा फूटाच्या छोट्या खोलीत दाटीवाटीने राहणाऱ्या बलरामवाले कुटुंबातील पाच जण गॅस गळतीमुळे बेशुद्ध अवस्थेत आढळले. रविवारी उपचारादरम्यान दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला, तर सोमवारी (१ सप्टेंबर) दुपारी आजीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. गॅस गळतीमुळे रक्तात कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या कुटुंबातील दोन जण मृत्यूशी झुंज देत असून, या घटनेने लष्कर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर बाजार पोलिस तपास करत असून, गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराबाबत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेमकं काय घडलं? बलरामवाले कुटुंब सोलापूरच्या नळबाजार चौकातील बालाजी मठाजवळील लोधी गल्लीत राहत होते. त्यांचे घर म्हणजे केवळ सात बाय दहा फूटाची एक खोली, जिथे पाच जण दाटीवाटीने राहत होते. या छोट्या खोलीत एका बाजूला गॅस शेगडी, समोर टीव्ही, खाली पिण्याच्या पाण्याची भांडी आणि इतर साहित्य ठेवलेलं होतं. हवा खेळती नसलेली ही खोली दुर्घटनेचं मुख्य कारण ठरली. शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री कुटुंबाने एक किलो भातापासून खिचडी बनवून जेवण केलं आणि झोपी गेले. रात्री गॅस सिलिंडरचा नॉब नीट बंद न झाल्याने गॅस गळती सुरू झाली. हवाबंद खोलीत गॅस साचल्याने कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढले, ज्यामुळे कुटुंबातील पाचही जण बेशुद्ध झाले. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी दरवाजा बंद असल्याचे पाहिले. रंजनाबाईंसोबत विडी काम करणाऱ्या एका महिलेने दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. आत गॅसचा तीव्र वास आणि सर्वांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी तात्काळ नातेवाईकांना कळवले आणि कुटुंबाला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोन चिमुकल्यांचा आणि नंतर आजीचा मृत्यू झाला.