पुणे जिल्हा | मानस लेक सिटीमध्ये फॅमिली रन उत्साहात

पौड, (वार्ताहर) – भुकूम (ता. मुळशी) येथील मानस लेक सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फॅमिली रन-कमिट टू फिट छोटेखानी मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात 5 वर्षांपासून ते 75 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 500 धावपटूंनी सहभाग घेतला.
फिटनेसप्रेमी आणि धावपटूंच्या उत्साहात भर टाकणार्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील आणि स्तरातील धावपटूंनी सहभाग घेतला. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन मानस लेक रनर्स चे अशोक नाळपे, मनीष थोरात, शेखर साखरे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
मानस लेक सिटीमध्ये राहणारे धावपटू कै. हर्षद पिंगळे यांचे अपघाती निधन झाले होते त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कार्यक्रमातील उत्साह वाढवण्यासाठी झुम्बा वॉर्म-अप सत्र आयोजित करण्यात आले होते. या छोटेखानी मॅरेथॉन साठी मेडिकल टीम अत्यावश्यक सेवा पाणी अशा विविध प्रकारच्या सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
सकाळी 6:30 वाजता 5 किमी धावण्याचा आणि 6:50 वाजता 3 किमी धावण्यासाठी धावपटूंना झेंडा दाखवून सुरुवात मॅरेथॉनची करण्यात आली. मानस लेकच्या नयनरम्य वातावरणात धावण्याचा अनुभव सर्वांसाठी आनंददायी असल्याचे मत अनेक धावपटूंनी व्यक्त केले.
बहुतेक धावपटू सकाळी 7:30 वाजता आपली धाव पूर्ण करून फिनिश लाइन पार करताना दिसले. कार्यक्रमानंतर कौस्तुभ सुधीर झिरपे यांच्या सीपीआर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांमध्ये वायुसेनेचे हेलिकॉप्टर पायलट, 3 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर, ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर जे. के. महापात्रा, निवृत्त वॉरंट ऑफिसर एअर फोर्स के. एल. शर्मा, माजी वायुसेना सदानंद जाटाळे, आणि अभिनेत्री राधा सागर यांचा सन्मान करण्यात आला.





