Nagar | मतदार जनजागृतीसाठी कोळगावात मॅरेथॉन स्पर्धा

श्रीगोंदा, (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याबरोबर मतदान प्रक्रियेतून कुणीही वंचित राहू नये, मतदान करणे सर्वांचे कर्तव्य आहे, अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन विद्यार्थिनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येऊन गावात मतदान जनजागृती करण्यात आली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वीप समिती अंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री कोळाईदेवी विद्यालयामध्ये मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख मंजुश्री धीवर यांनी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन केले. यात विद्यालयातील इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांच्या हस्ते मुख्य चौकात नारळ फोडून मॅरेथॉन स्पर्धा सुरू करण्यात आली.
यावेळी संजय ठोकळ, प्रवीणकुमार लोंढे, माऊली गलांडे, सविता कार्ले ,सोनाली कळसकर, पाटोळे, प्रिया सरोदे व उषा गायकवाड उपस्थित होते. मॅरेथॉन सुरू होताच उपस्थित विद्यार्थिनींनी टाळ्या वाजून स्पर्धकांना प्रोत्साहित केले. प्रथमेश नंदकुमार नलगे ,यश नवनाथ आरकस, स्वयमं अमित लगड या स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये यश प्राप्त केले. पल्लवी जाधव व ज्योती लोमटे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





