भयंकर अपघात ! कार शिकताना ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यातील वणी-घुग्गुस मार्गावर जन्नत सेलिब्रेशन हॉलजवळ एक ह्रदयद्रावक अपघात घडला. कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलीला कार चालवण्याचे प्रशिक्षण देताना हो घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वणीतील लालपुलिया परिसरातील रहिवासी रियाज शेख (वय ५४) हे ट्रक दुरुस्तीचे व्यावसायिक होते आणि स्वतःचे गॅरेज चालवत होते. ते आपल्या मुलीला कार शिकवण्यासाठी घुग्गुस मार्गावर घेऊन गेले होते. कार चालवताना मुलीचे नियंत्रण सुटले आणि ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबल्याने कार दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या उलट्या दिशेने गेली. समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली, या अपघातात कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात कारमधील तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर रियाज यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृतांमध्ये रियाज यांच्या भावाच्या मुलीचाही समावेश आहे. मायरा शेख (वय १७), अनिबा (वय ११), झोया (वय १३) आणि रियाज शेख (वय ५४) अशी मृत्यू झालेल्यांची नवे आहेत.
या घटनेमुळे वणी शहरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.





