नादुरुस्त जनरेटरमुळे अंत्यविधीस अडथळे

प्रशासनाचे दुर्लक्ष : नातेवाइकांची होतेय तारांबळ
पिंपळे गुरव – जुनी सांगवी येथे स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी बसविण्यात आली आहे. याठिकाणी दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी व आजूबाजूच्या परिसरातील लोक आपल्या नातवाइकांचा अंत्यविधी करण्यासाठी येत असतात. परंतु येथे पालिका प्रशासनाने विद्यत शवदाहिनी बसविली आहे तिचे जनरेटर अनेक वेळा खराब होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
नागरिक आपल्या नातेवाइकांचा मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत घेऊन आल्यानंतर येथील जनरेटर नादुरुस्त असल्याने येथे दहन करता येणार नाही अशी माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ होत आहे. अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुन्हा शवगाडी घेऊन दुसऱ्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी जावे लागत आहे.
सध्या येथे भाडेतत्त्वावर जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात कोणते अर्थकारण धडलेले आहे, असा प्रश्न परिसरातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मागील काही दिवसांपूर्वी दापोडी, नवी सांगवी परिसरातील 3 मृतदेह अंत्यविधीसाठी येथे आणले होते. पण जनरेटर आभावी अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला होता.
अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर व्यवस्था होते. नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी महापालिका प्रशासनाने येथे शवदाहिनी निर्माण केली आहे. परंतु येथे कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी दोन जनरेटर असताना ते खराब तर कधी नादुरुस्त असतात त्यामुळे सर्व सामान्य माणसांना त्रास सहन करावा लागत आहे. या नागरिकांना जनरेटर भाड्याने आणून किंवा दुसऱ्या स्मशानभूमीत मृतदेह घेऊन जाऊन अंत्यविधी करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविषयी नाराजीचा सूर आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित येथील व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन दुसरे जनरेटर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले आहे. शहरातील इतर ठिकाणचे मृतदेहदेखील अंत्यविधीसाठी येथे आणण्यात येत होते. परंतु ते बंद केल्यामुळे सध्या नागरिकांची अडचण होत नाही.
– दिलीप धुमाळ, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग




