‘आमच्या वेबसाईटवर चुकीची माहिती’ पीएमपी अधिकाऱ्यांकडून आकडेवारीत लपवाछपवी

पुणे– शहरात प्रवाशांची गर्दी वाढत असताना, बसची संख्या वाढण्याएवजी ती कमी झाल्याचे पीएमपीच्या वेबसाईटवरील आकडेवारीतून दिसून येते. मार्गावरील बसची संख्या दीड हजारांपर्यंत खाली आहे. मात्र, पीएमपीच्या अधिकार्यांकडून मार्गावरील बसची संख्या नियमित आल्याचे सांगत आहेत. धक्कादायक म्हणजे आमच्या वेबसाईटवर चुकीची माहिती आहे, हेच स्वत: अधिकारीच सांगत असल्याने नक्की खरं कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते. या परिसरात पीएमपीचे एकूण ३८१ मार्ग आहेत. पीएमपीच्या ताफ्यात एकूण २०८० बस आहेत. पण, त्यापैकी फक्त दीड हजार बस सध्या मार्गावर धावत असल्याचे पीएमपीच्या वेबसाईटवर दिसत आहे. तसेच, मार्गावरील बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मार्गावरील बस कमी झाल्याचे पीएमपीच्या वेबसाईटवर दिसत आहे.
पीएमपीच्या बसचे आरटीओ पासिंग व दुरूस्तीसाठी काही गाड्या बंद ठेवल्याचे अधिकारी सांगत आहेत. पण, वाहतूक विभागाकडून मार्गावरील बस नियमितपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेबसाईटवरील माहिती खरी की अधिकारी सांगतात ती माहिती खरी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आॅक्टोबर महिन्यात दिवसाला साधारण सतराशेच्या जवळपास बस मार्गावर होत्या. त्यामधून दिवसाला साधारण १२ ते १३ लाख प्रवासी प्रवास करत होते. पण, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मार्गावरील बसची संख्या घटत असल्याचे वेबसाईटवरून दिसत आहे. तसेच, अनेक महत्वाच्या मार्गावरील नागरिक बसमध्ये लटकून प्रवास करत असून, थांब्यावरही गर्दी असल्याचे पहायला मिळत आहे. काही मार्गावर बस वेळेवर येत नसल्याचा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.
“रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या आणि वेबसाईटवरील अकडेवारी एकच पाहिजे. पीएमपीच्या एकूण बसपैकी ८० टक्के बस मार्गावर असल्याच पाहिजे. पण, तसे काही होताना दिसत नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.”- संजय शितोळे – पीएमपी प्रवासी मंच
“पीएमपीच्या गुरूवारी १७९७ गाड्या मार्गावर होत्या. वेबसाईटवर मार्गावर असलेल्या बसची संख्या चुकीची दाखवलेली असू शकते. त्याबाबत माहिती घेतो.” – नितीन नार्वेकर सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी





