नसरापूर स्मशानभूमी परिसरात पडल्या विद्युत तारा : शाळकरी मुलांचा जीव धोक्यात, महावितरणाने तात्काळ दखल घेण्याची मागणी

नसरापूर: कालच्या जोरदार पावसामुळे नसरापूर येथील स्मशानभूमी परिसरात विद्युत तारा झाडांवर पडून खाली आल्याने मोठा अपघात टळला. या परिसरातून दररोज शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत हा प्रकार घडणे म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे फलित असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
या भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने त्या तुटून जमिनीवर आल्या. सुदैवाने त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र ही घटना भविष्यातील संभाव्य धोका अधोरेखित करणारी आहे.
स्मशानभूमीच्या बाजूने शाळेतील विद्यार्थी ये-जा करतात. अशा ठिकाणी पडलेल्या विद्युत तारा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करतात. त्यामुळे महावितरणने पावसाळ्याच्या सुरुवातीपूर्वीच झाडांची छाटणी करून अशा घटनांना आळा घालणे आवश्यक होते.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच पुढील काळात नियमित झाडांची छाटणी करून जनतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





