एआयचा घातकी वापर… ! डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ व्हायरल, कराडमध्ये खळबळ

कराड (सातारा) : तंत्रज्ञान आशीर्वाद ठरण्याऐवजी शाप ठरत असल्याचे धक्कादायक उदाहरण कराडमध्ये समोर आले आहे. येथील महिला डॉक्टरसह इतर दोन डॉक्टर आणि एका युवक-युवतीचा बनावट अश्लील व्हिडीओ एआय (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
२० मे रोजी एका युवतीला अनोळखी व्यक्तीने एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. या ग्रुपमध्ये २६ सदस्य होते. त्याच रात्री, ग्रुपवर एक अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ महिला डॉक्टर आणि तिची कोणतीही ओळख नसलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्यांचा वापर करून तयार करण्यात आला होता. याच ग्रुपवर काही वेळाने तक्रारदार युवती आणि एका युवकाचा दुसरा अश्लील व्हिडीओही टाकण्यात आला.
त्यानंतर संबंधित युवतीने त्वरित सर्व माहिती गोळा करत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला असून, तपास सुरु केला आहे.
तांत्रिक सुत्रधार डॉक्टर?
या बनावट व्हिडीओजच्या मागे असलेला मुख्य सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणारा एक संशयित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने हे व्हिडीओ तयार करण्यासाठी परराज्यातील व्यक्तींना पैसे दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी काही महत्त्वाचे डिजिटल साहित्य जप्त केले असून, चौकशीदरम्यान अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा इशारा :
सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या लिंक, ग्रुप आमंत्रणे यांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असून, कोणतीही शंका असल्यास तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.





