Fake Currency Case : बनावट नोटा प्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

Fake Currency Case : पुणे शहरात शंभर आणि पाचशेच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या एका गुजरातमधील नागरिकास समर्थ पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या ताब्यातून ७७ हजार रकमेच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव रामप्रसाद सविता (रा.जामनगर, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई लखन शेटे यांनी तक्रार दिली आहे. नोटांसह मोबाईल व इतर साहित्य असा एक लाख ५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार समर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यावेळी फिर्यादी पोलीस शिपाई शेटे आणि शशिकांत पाटील परिसरातील लॉजेस तपासत होते. तेव्हा त्यांना खबर मिळाली की, एक व्यक्ती बनावट नोटा वापरत आहे. तसेच तो सध्या अपोलो थिएटरजवळ उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला आहे.
त्यानूसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून निघुन जाऊ लागला. मात्र त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपये दराच्या ६१ अशा ७७ हजार १०० रुपये रकमेच्या बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव करत आहेत.
आरोपी गौरव हा हिमाचल प्रदेशात एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. तो पुणे शहरात फिरायला आल्याचे सांगत आहे. मात्र तो बनावट नोटा मोठ्या शहरांमध्ये वटवून घेण्याच्या उद्देशाने जात असावा अशी शक्यता आहे. या नोटा हुबेहुब असल्यातरी त्याच्यावर वॉटरमार्क छपाईनंतर लावण्यात आला आहे.
तसेच नोटांच्यामधील सिल्वर कलरची लाईनही तुटक आहे. त्याच्याकडे संगणकाचा सीपीयु सापडल्याने त्याला छपाईचे तंत्रज्ञान अवगत असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या तरी तो राजस्थान येथून त्या आणल्याचे सांगत आहे.





