Pune | लसीबाबत जनजागृती करण्यात अपयश

पुणे, – पुण्यासह राज्यात इन्फ्लूएन्झा (स्वाइन फ्लू) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर्षीपासून जोखीमग्रस्त रुग्णांना सरकारी रुग्णालयांतून मोफत इन्फ्लूएन्झा लसीकरण सुरू केले आहे. मात्र, या लसीकरणाबाबत जनजागृती करण्याला आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये पुणे परिमंडळासाठी (पुणे, सातारा, सोलापूर) १३ हजार डोस वितरित केले आहेत. मात्र, यावर्षी पुणे परिमंडळात केवळ ९ जोखीमग्रस्त रुग्णांना लस दिली आहे. तर, राज्यात ४५ हजार डोस वितरित केले असून, त्यापैकी यावर्षी केवळ २६०८ जोखीमग्रस्त रुग्णांना लस दिली गेली आहे.
राज्यात इन्फ्लूएन्झा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये एच १ एन १ (स्वाइन फ्लू) आणि एच ३ एन २ या विषाणूंजी ज्यांना लागण झाली आहे, त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. यावर्षी राज्यातील सरकारी रुग्णालयांत २१ लाख रूग्णांची तपासणी केली. त्यातील ५ हजार ७२० संशयित रुग्णांना ऑसेल्टॅमिवीर हे औषध दिले. तर आतापर्यंत २,३२५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या वतीने यावर्षीपासून जोखीमग्रस्त रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांत मोफत लसीकरण आयोजित करण्यात येते. हे लसीकरण दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गर्भवती मातांसोबतच मधुमेह आणि उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्लू प्रतिबंधक लसीकरण करता येते.
मात्र, याविषयी पुरेशी जागृतीच झालेली नसल्याने ही लस केवळ नऊच लोकांपर्यंत पोहोचली आहे. आता थंडी सुरू झाली असून या काळात फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे याविषयी अधिक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.





