पुणे जिल्हा | खेड-आळंदीत आघाडीत बिघाडी?

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – आमच्या कष्ट आणि मतांवर आमदार, खासदार होतात आणि आम्हालाच विसरतात. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असताना विधानसभेची उमेदवारी देताना विचारात घेतले जात नाही.
यावेळी मात्र विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देत उमेदवारी अर्ज दाखल करणार, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी दिला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसोबत शनिवारी (दि. 19) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे राज्य युवक सचिव अमोल दौंडकर,
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना सातपुते, जमीर काझी, चंद्रकात गोरे, माजी उपसभापती सतीश राक्षे, सुभाष होले, भाऊसाहेब गायकवाड, पंडित पवार, सुनिल मिंडे, निलेश कड, दत्ता गोरे, आतिश मांजरे, निखील थिगळे, उमेश रानवडे, धनेश म्हसे, सुभाष गाढवे, अॅड. दीपक थिगळे, अनिल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
डोळस पुढे म्हणाले की, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर दोन वेळा खासदार झाले. दिलीप मोहिते पाटील तीन वेळा आमदार झाले. पक्षीय मतभेद निर्माण झाल्यावर काँग्रेस पक्ष खेड तालुक्यात नेहमी विद्यमान आमदारांच्या विरोधात भुमिका घेत राहिला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे सर्व पक्ष एकत्र आले आणि आम्हाला पक्षाने सांगितले की महाविकास आघाडीचे काम करा. कार्यकर्त्यांनी मान्य केले.
मात्र शुक्रवारी (दि 18) चाकण येथे झालेल्या सर्व पक्षीय बैठकीला आमच्याच सहकार्यांनी आम्हाला माहिती दिली नाही. ती सर्व पक्षीय बैठक नसून सेटलमेंटसाठी एकत्र आले, असा घणाघात त्यांनी केला.
मंगळवार, बुधवारी उमेदवार समोर येईल
सर्वमान्य पर्याय देण्याच्या बहाण्याने आघाडीचे कार्यकर्ते महायुती बरोबर बैठक घेतात. त्याची साधी माहिती सुद्धा दिली जात नाही. असे असेल तर आम्हाला आमच्या पक्षाची ताकद सिद्ध करून दाखवावी लागेल. त्या दृष्टीने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा प्रबळ दावेदार आहे.
म्हणुनच आम्ही मंगळवार (दि. 22), बुधवारी (दि. 23) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. आमचा उमेदवार त्याच दिवशी समोर येईल, असे विजय डोळस यांनी घोषित केले.




