‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. सिंधिया यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती अपवित्र असल्याचे म्हटले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, सिंधिया म्हणाले, “गेल्या २.५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासात अपवित्र आघाडीमुळे (महा विकास आघाडी) अडथळे येत होते. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला.
मला खात्री आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील. सिंधिया यांनी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात काँग्रेस सरकार पाडून भाजपला सरकार बनवण्यातही मदत केली होती. ते स्वत: राज्य मंत्रिमंडळाचा भाग बनले नसले तरी त्यांना केंद्रात केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री पद सांभाळण्यासाठी देण्यात आले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना महाविकास आघाडीवर वृत्तवाहिनींशी बोलतांना सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे मध्य प्रदेशातील घडामोडी पुन्हा एकदा जनतेच्या लक्षात आल्या आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेसचे सरकार पाडल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत, हा एकच प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदेंनीही आपल्या पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मार्च २०२० मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारलं.
काँग्रेस सरकार पाडल्यानंतर सिंधिया यांना भाजपकडून राज्यसभेची जागा मिळाली. सरकार पडल्यानंतर दीड वर्षांनी त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची खुर्ची मिळाली. सिंधिया यांच्या 11 समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता सिंधिया यांचे 9 समर्थक मंत्रीमंडळात उरले आहेत. सिंधिया समर्थकांना कॉर्पोरेशन बोर्डात राजकीय नियुक्त्याही देण्यात आल्या.





