निवडणुकीत फडणवीस, शिंदे अन् अजित पवारांनी मिळून 15 हजार कोटी उडवले; ‘या’ खासदाराच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अभूतपूर्व’ म्हटले आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या विजयावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत १५ हजार कोटी रुपये उडवले असून, मतदारांना पैसा पाण्यासारखा वाहिला गेला, असा दावा राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, भाजपच्या विजयाची हॅट्रिक, मॅट्रिक, सॅट्रिक आहे. पण हे अभूतपूर्व यश पैसा वाटपाची किमया आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून १५ हजार कोटी रुपये खर्च केले. मतदारांना थेट पैसे दिले गेले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
त्यांनी एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल करत म्हटले, शिंदे म्हणतात आमची शिवसेना असली तर अमित शाहांचे पाय धुवून तीर्थ घ्या. जी शिवसेना अमित शाहांनी दिली, तिचे पुण्य तुम्हाला मिळत आहे, असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयावर नाराजी
शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या मालकीच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विलंबावर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, निवडणूक चिन्हाचा निर्णय प्रलंबित आहे कारण न्यायालयावर दबाव आहे. माणिकराव कोकाटे प्रकरणात सहा तासात निर्णय देतात, पण ४० आमदारांच्या बंडाबाबत अजून निर्णय नाही. आता २१ जानेवारीची तारीख दिली आहे. निवडणुका झाल्यानंतर हे प्रकरणही तुम्ही खा, असे म्हणायचे का?
फडणवीस काय म्हणाले?
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या विजयाचे कौतुक करत म्हटले आहे, महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. महायुतीने ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आणले. महाराष्ट्रात भाजप हा क्रमांक एकचा पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. महाविकास आघाडीचा पूर्ण सफाया केला आहे. नागपूर जिल्ह्यातील यशाबद्दलही त्यांनी मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले.





